जम्मू – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी पैसा गोळा करणारे रॅकेट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणले. त्या रॅकेटच्या 6 सदस्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे जम्मू विभागात पुन्हा दहशतवादी जाळे पसरवण्याच्या तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा बसला आहे.
जम्मूत तोयबाला पुनरूज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा भारतीय लष्कराच्या गुप्तचरांना लागला. त्यांनी ती माहिती पोलिसांना आणि इतर सुरक्षा दलांना दिली. त्याआधारे मुदस्सर फारूक बट याला पकडण्यात आले. त्याच्याकडे दीड लाख रूपयांची रोकड सापडली.
तो पैसा तोयबाच्या दहशतवाद्यांना पुरवला जाणार असल्याची कबुली त्याने चौकशीवेळी दिली. त्याने तोयबासाठी पैसा गोळा करणाऱ्या रॅकेटमधील इतर साथीदारांची माहितीही दिली. त्यानंतर आणखी पाच जणांना पकडण्यात आले. ते सर्व जण पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या मोहम्मद अमिन बट उर्फ हरून या तोयबाच्या दहशतवाद्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले.
जम्मू-काश्मीरचा रहिवासी असणारा हरून 1997 मध्ये पाकिस्तानात गेला. तिथे त्याने तोयबाकडून शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2006 मध्ये तो परतला. मात्र, सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्याने त्याने पुन्हा पाकिस्तान गाठले. तिथून तो तोयबासाठी पैसा गोळा करणारे आणि दहशतवाद्यांची भरती करणारे रॅकेट चालवत असल्याचे समजते.