TRP फेरफार प्रकरणी EDकडून ‘मनी लॉण्डरिंग’चा गुन्हा दाखल

नवी दिल्ली – टीव्ही जगतात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या टीआरपी फेरफार प्रकरणाच्या चौकशीसाठी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) सज्ज झाले आहे. त्या प्रकरणी ईडीकडून मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी मागील महिन्यात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटस्‌मध्ये (टीआरपी) फेरफार करण्याशी संबंधित घोटाळा उघडकीस आणला. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवताना रिपब्लिक टीव्ही, दोन मराठी वाहिन्या आणि काही व्यक्तींचा नामोल्लेख केला. पोलिसांकडून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याची छाननी करून ईडीने पाऊल उचलले आहे.

आता पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामुळे संशयाच्या घेऱ्यात आलेल्या वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना आणि इतर आरोपींना ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्‍यता आहे. टीआरपीमुळे कुठला टीव्ही कार्यक्रम अधिक पाहिला जातो आणि कुठली वाहिनी लोकप्रिय आहे याची निश्‍चिती होते. वाहिन्यांना जाहिरातींच्या रूपाने मिळणारा महसूल टीआरपीवर आधारलेला असतो.

त्यामुळे वाहिन्यांच्या दृष्टीने टीआरपीला महत्व आहे. त्यातूनच टीआरपी वाढवण्यासाठी काही वाहिन्यांनी अनेक कुटूंबांना पैशांच्या रूपात लाच दिल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी संबंधित घोटाळा चव्हाट्यावर आणताना केला. मात्र, तो आरोप संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाहिन्यांनी आणि आरोपींनी फेटाळून लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.