पुणे विद्यापीठात मानधन वितरणात गोलमाल

‘कमवा व शिका’मध्ये बोगस विद्यार्थी असल्याचा संशय


भलत्याच विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते रक्‍कम

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वितरित करतांना काही आर्थिक अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे. योजनेंतर्गत दिले जाणारे मानधन संबंधित विद्यार्थ्यांना न मिळता दुसऱ्याच विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर या योजनेत बोगस विद्यार्थ्यांचा समावेश आहे का? या सर्व प्रकरणाची विद्यापीठाने रविवारी गंभीर दखल घेतली आहे.

पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही राबविली जाते. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति तास 45 रुपये प्रमाणे विद्यार्थ्यांना मानधन दिले जाते. दररोज तीन तास काम करण्याची मुभा आहे. त्यानुसार महिनाभरात सहभागी विद्यार्थ्यांनी किती तास काम केले, त्यानुसार मानधन दिले जाते. विद्यार्थ्यांचे एक महिन्याचे भोजनालय, वसतिगृह व अन्य खर्च निघून जाते. त्यामुळे ही योजना ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. याच मानधनावरून आता मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यापीठातील सर्व योजनांचा नियमित आढावा घेतला जातो. त्यानुसार विद्यापीठातील “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजेचा अशाच प्रकारचा आढावा विद्यापीठाकडून घेण्यात आला. त्यात या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वितरित करताना शंकास्पद बाबी विद्यापीठाच्या समोर आल्या. सहभागी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात मानधन न जाता वेगळ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे उघड झाले. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात येताच विद्यापीठाने तातडीने पाऊल उचलले.

सीलबंद केल्या फाईल
कमवा व शिका योजनेतील आर्थिक अनियमितता निदर्शनाच येताच विद्यार्थी कल्याण मंडळाने कार्यालयातील महत्त्वाचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहे. तसेच याबाबतची सर्व कागदपत्रे हाती घेण्यात आले असून, कार्यालयातील काही भाग सीलबंद केले आहे. त्यामुळे महत्त्वाचे कागदपत्रे गहाळ होऊ नये, यासाठी विद्यापीठाने तत्परता दाखविली आहे. परिणामी, समितीला योग्य पद्धतीने चौकशी करणे शक्‍य होण्याची चिन्हे आहेत.

सर्व योजनांच्या नियमित आढावाच्या वेळी कमवा व शिका योजनेतील आर्थिक अनिममितता झाली आहे. या सर्व प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यांत अपेक्षित आहे.
डॉ. प्रभाकर देसाई, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ संकुल
कमवा व शिका योजनेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या : 1,287
प्रति तास मानधन : 45 रुपये
तीस दिवसांचे मानधन : 4 हजार 50

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.