दिल्लीत सोमवारी, साताऱ्यात मंगळवारी

झेडपी सीईओंची कार्यतत्परता; कर्मचाऱ्यांनी बोध घेण्याची गरज

सातारा – सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक दुसऱ्यांदा देशपातळीवर पोहचविणारे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या कार्यतत्परतेचे दिशादर्शक उदहारण पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीत सोमवारी आयोजित सन्मान ते सोहळ्यास उपस्थित राहिले तर मंगळवारी सकाळी आपल्या दालनात हजर झाले. नुसते हजर झाले नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविताना दिसून आले.

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा सोमवारी पुन्हा एकदा सन्मान झाला. स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेने यश प्राप्त केले. त्यानिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात सोमवारी दि.24 रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे व उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. त्यानंतर शिंदे तत्काळ विमानाने पुण्याला रवाना झाले. रात्री उशिरा ते साताऱ्यात दाखल झाले आणि मंगळवार दि. 25 रोजी सकाळी दहा वाजता आपल्या दालनात दाखल झाले. एवढेच नव्हे तर नेहमीप्रमाणे खातेप्रमुखांशी बैठका सुरू झाल्या. त्याचबरोबर दिल्लीतील सन्मानानिमित्त नागरिकांच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार केला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शक्‍य तेवढी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्‍वासित करताना दिसून आले.

शिंदे यांच्या कार्यकालात त्यांनी पदाधिकारी आणि सहकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सातारा जिल्हा परिषदेचे नाव देशात पोहचविले. नुकताच स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेतील यश आणि यापूर्वी स्वच्छ भारत अभियानात देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून देण्यासाठी शिंदे यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याचे दिसून आले. त्याचबरोबर पुरस्काराचा कोणताही आविर्भाव न बाळगता ते दोन्ही दिल्ली दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालयात हजर राहून पुढील कामाला प्राधान्य देताना दिसून आले. त्यामुळे साहजिकच एखाद्या संस्थेचा प्रमुख म्हणून उत्तम प्रशासकीय अधिकारी कसा असावा, याचे दिशादर्शक उदाहरण सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना घालून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.