पिंपरी – कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून तिला बाहेर फिरायला येण्यास सांगितले. तसेच मर्जीप्रमाणे न वागल्यास कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून कर्मचारी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी कंपनीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली.
अभय नरवडेकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कर्मचारी महिलेने शनिवारी (दि. 29) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राधिकरण निगडी येथे हेडगेवार भवन येथील ए. जी. एनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीमध्ये आरोपी प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत आहे.
तर पीडित महिला याच ठिकाणी कर्मचारी होती. कामाचे रिपोर्टींग करण्यासाठी फिर्यादी महिला आरोपीकडे जात त्यावेळी “तू मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जाऊ’ असे म्हणून आरोपी शरीरसुखाची मागणी करीत असे. “बाहेर फिरायला जाऊ, जेवण करू’ असे म्हणून वारंवार महिलेला त्रास देत असे. तसेच आपल्या मनाविरुद्ध वागल्यास आरोपीने फिर्यादी महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.