नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तसेच यावेळी आरोपीने त्यांना फरपटत नेल्याचेही त्या म्हणाल्या. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी मध्यरात्री 3.11 वाजेच्या सुमारास एम्स रुग्णालयाजवळ घडला.
स्वाती मालीवाल यांना बुधवारी रात्री एका कार चालकाने 10-15 मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेतून मालीवाल थोडक्यात बचावल्या. कारमध्ये बसण्यास विरोध केल्याने चालकाने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी सुरु आहे. स्वाती मालीवाल यांनी स्वत: ट्विट करत घडल्या प्रकाराला दुजोरा दिला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक हरिश चंद्रा (47) याला अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, देशात अलीकडेच एका तरुणीला कार चालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेत संबंधित तरुणाची मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण होत नाही तोवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही एका कार चालकाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.