कामशेत – खंडणीसारखे गंभीर गुन्हे करून कामशेतमध्ये दहशत पसरवणाऱ्या धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. चॉकलेट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (वय 30, रा. कामशेत गावठाण), डिग्या उर्फ रोशन बाळू शिंदे (वय 20), सोन्या उर्फ प्रसाद तुकाराम शिंदे (वय 19), श्रीधर श्रीकांत हुले, अक्षय प्रकाश वाघ (वय 23), दिनेश दिपक शिंदे, शुभम गायकवाड (वय 21) मनोज देशमुख (वय 22), राजु ज्ञानेश्वर पठारे (सर्व रा. कामशेत) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीने अनुराग गादीया यांचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले होते. तसेच सुटका करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही या टोळीने दिली होती. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेत असताना टोळीतील आरोपी दिनेश दिपक शिंदे याने (दि. 22) दहिवली गावात मंथन सातकर याचा गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण केली. या गुन्ह्यामध्ये आरोपी दिनेश शिंदेला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे.
धनेश उर्फ चॉकलेट दिलिप शिंदे व त्याच्या टोळीतील सदस्यांची मावळात दहशत असल्याने त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव संदीप पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, विठ्ठल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, पोलीस हवालदार दरेकर, संतोष घोलप, समीर शेख, बाळकृष्ण भोईर यांनी केली.