खंडणी मागणारे मोकाटच

शिक्रापूर येथील घटना ः पोलीस स्टेशन आवारातच दिली होती धमकी
शिक्रापूर (वार्ताहर) –
येथील एका प्लॉटिंग व्यावसायिकास बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. तरीदेखील गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे प्लॉटिंग व्यवसाय करणारे सुधीर धुमाळ यांनी त्यांच्या काही मित्रांसमवेत जमीन विकत घेत प्लॉटिंग केले. परंतु घेतलेल्या जमिनीचे मूळ मालकाच्या वारसदारांनी आक्षेप घेतल्याने त्या जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित असताना, या जमिनीमध्ये पैसे न गुंतविता भागीदार झालेले पिंटू दरेकर हे धुमाळ यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करू लागले. यावेळी धुमाळ यांनी जमिनीचा निकाल लागल्यानंतर जमीन विक्रीतून येणाऱ्या पैशातून पैसे देऊ असे सांगितले. मात्र 25 जुलै रोजी विशाल ढोले व सागर वर्पे यांनी धुमाळ यांना बोलावून घेत आम्हाला पिंटू दरेकर यांनी पाठविले असल्याचे सांगितले.

पिंटू पार्टनर असलेल्या व इतर जमिनींचे मिळून दीड कोटी रुपये सहा महिन्यांमध्ये देण्यास तयार हो नाहीतर तुला फार महागात पडेल अशी धमकी देत दमदाटी करण्यात आली. यावेळी सागर याने धुमाळ यांच्या पोटाला बंदूक लावली. जर पिंटूच्या सांगण्याप्रमाणे पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार देण्यासाठी धुमाळ हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गेले असता सागर वर्पे व पिंटू दरेकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच धुमाळ यांना तक्रार दिली तर गोळ्या घालू अशी धमकी दिली होती. याबाबत सुधीर संभाजी धुमाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. मात्र, या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.

शिक्रापूर येथे प्लॉटिंग व्यावसायिकास बंदुकीच्या धाकाने खंडणी मागितलेल्या गुन्ह्यातील सर्व तपास केला आहे. आरोपींबाबत पुरावे देखील उपलब्ध झालेले असून आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.आरोपींना शोध सुरू असून लवकरच आरोपी अटक केले जातील.
– किरण भालेकर,पोलीस उपनिरीक्षक, शिक्रापूर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.