पुणे – शहराला डुक्कर मुक्त करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून, दोन दिवसांत त्याचे कामही सुरू होणार आहे.
डुक्कर पकडण्यासाठी महापालिकेने खास कर्नाटकातील व्यक्तीला काम दिले आहे. त्या व्यक्तीला येत्या दोन दिवसांत महापालिकेकडून मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार असून, लगेचच संपूर्ण शहरात मोकाट डुक्कर पकडण्यास सुरुवात होणार आहे. उपनगरांमध्ये मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होत असून, मालमत्तेचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने जाहीर प्रकटनाद्वारे शहरातील सर्व डुक्कर 23 ऑगस्ट 2019 पर्यंत शहराबाहेर घेऊन जाण्याचे आवाहन डुक्कर मालकांना केले होते.
या तारखेनंतर शहरात जी डुक्करे आढळतील ती महापालिकेच्या मालकीची असतील, त्या डुक्करांवर मालकांचा कोणताही अधिकार राहणार नाही, असा इशाराही या प्रकटनाद्वारे देण्यात आला होता. याशिवाय शहरातील 58 डुक्कर व्यावसायिकांना नोटीस दिली होती. त्यानंतर शहरातील डुक्कर महापालिकेकडून जप्त करण्यात येतील, असे जाहीर प्रकटन 9 ऑगस्ट 2019 रोजी दिले होते. यानंतरही शहराच्या विविध भागांत डुक्करांची समस्या आहे. या संदर्भात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेच्या अति. आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडे विचारणा करून यासंदर्भात त्वरित पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कर्नाटकातील दुर्गप्पा ढोणी यांना डुक्कर पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
डुक्करांच्या गाडीला कर्नाटक सीमेपर्यंत पोलीस बंदोबस्त
भटकी डुक्करे पकडण्यासाठी ढोणी यांना महापालिकेचे मनुष्यबळ, वाहने आणि पोलीस बंदोबस्त देण्याचेही नमूद केले आहे. पकडलेल्या डुक्करांच्या गाडीला कर्नाटकच्या सीमेपर्यंत पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. महापालिकेकडून या कारवाईसाठी टीम तयार करण्यात अली असून, ती टीम डुक्कर असलेले स्थळ आणि कारवाईची तारीख निश्चित करणार आहे. पोलीस बंदोबस्तासंदर्भात पोलिसांशी चर्चा सुरू असून, दोन दिवसांत कारवाईला सुरुवात करणार असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.