इराणचा लष्करी अणुशास्त्रज्ञ तेहरानमधील चकमकीत ठार; ‘या’ देशाचा हात असल्याचा संशय

दुबई – इराणच्या लष्करी अणू कार्यक्रमाशी संबंधीत एक अणु शास्त्रज्ञ तेहरान जवळील चकमकीत ठार झाल्याचे वृत्त आहे. मोहसेन फखीरजदेह असे त्याचे नाव असून हा वैज्ञानिक इस्त्रायलकडून झालेल्या कारवाईत ठार झाला असल्याचा आरोप इराणच्या विदेश मंत्र्यांने केला आहे.

दहा वर्षांपुर्वी इराणच्या अनेक अणु शास्त्रज्ञांना इस्त्रायलने ठार केले आहे त्याचीच ही आवृत्ती आहे असा आरोप इराणी विदेश मंत्र्यांनी केला आहे. मोहसेन फखीरजदेह हे नाव लक्षात ठेवा असे जाहीर आवाहन मध्यंतरी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांनी केले होंते याकडेही इराणच्या विदेश मंत्र्यांनी लक्ष वेधले होते.

या वैज्ञानिकाच्या हत्येमुळे मध्यपुर्वेत आणखी तणाव भडकण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. इराणच्या वादग्रस्त अण्विक कार्यक्रमाविषयी साऱ्या जगात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान मोहसेन यांच्या हत्येबाबत इराणच्या माध्यमांनी जे वृत्त दिले आहे त्यानुसार ते ज्या गाडीतून जात होते, त्या गाडीजवळ एक स्फोटाने भरलेला ट्रक नेऊन त्याचा स्फोट घडवण्यात आला, त्यात त्यांचे निधन झाले.

तत्पुर्वी एका गाडीतून उतरलेल्या पाच बंदुकधाऱ्यांनी मोहसेन यांची गाडी अडवून त्यांना बाहेर काढल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान घटना स्थळाचे जे फोटो उपलब्ध झाले आहेत त्यात त्यांच्या गाडीवरही बंदुकीच्या गोळ्या लागल्याचे दिसत आहे.

इराण सरकारकडून मात्र अजून या घटनेचा पुर्ण तपशील जाहीर झालेला नाही. त्यांच्या हत्येची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र हे इस्त्रायलचेच कृत्य असावे असा छातीठोक दावा इराणचे विदेश मंत्री मोहंमद जवाद झरीफ यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.