मोहिते पाटलांची पळशीत “चाय पे चर्चा’

घडामोडींना वेग; खंडाळ्यातील नाराजांसाठी भाजपकडून प्रवेशासाठी पायघड्या

रामराजेंच्या सेल्फीमुळे तर्कवितर्क

तालुक्‍याचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी व आमदारांच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी तालुक्‍यातील नाराज जुने जाणकार व ज्येष्ठ नेते एकत्र येऊन विरोध सुरू झाला आहे. यासाठी सर्वपक्षीय संघटनेची स्थापनाही करण्यात आली. ही संघटना प्रभावी ठरत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसून येऊ लागले आहे. विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे व बकाजीराव पाटील यांच्यासमवेत सेल्फी काढून चाय पे चर्चा केल्याने तालुक्‍यातील राजकारणाला कोणती कलाटणी मिळणार, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

शिरवळ, दि. 13 (प्रतिनिधी) -खंडाळा तालुक्‍यातील राजकीय घडामोडींनी गेल्या काही महिन्यांपासून वेग घेतला असून आमदार मकरंद पाटील यांच्या एकाधिकारशाहीला शह देण्यासाठी व तालुक्‍यातील राष्ट्रवादीची टिकटिक कायमची थांबविण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी चांगलाच चंग बांधला आहे. या एकवटलेल्या नाराज मंडळीना आपल्या कंपूत समाविष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पायघड्या घातल्या असून लवकरच तालुका भाजपमय होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. याच अनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे- पाटील यांच्यात पळशी येथे रंगलेली “चाय पे चर्चा ” राष्ट्रवादी व मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे.

खंडाळा तालुक्‍यात गत अडीच वर्षात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी याला बंधाराच तयार न झाल्याने या पाण्याचा वेग सुसाट झाला आहे.
दिग्गजांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करण्याचा प्रयत्न झाल्याने तालुक्‍याचे स्वतंत्र असे अस्तित्व जपण्यासाठी व आमदारांच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी तालुक्‍यातील जुने जाणकार व ज्येष्ठ नेते एकत्र येऊन विरोध सुरू झाला. यासाठी सर्वपक्षीय संघटनेची स्थापनाही करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही संघटना प्रभावी ठरत असल्याचे गत दोन दिवसांपासून दिसून येऊ लागले आहे. नुकतेच विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निांबळकर यांनी तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते शंकराराव गाढवे व बकाजीराव पाटील यांच्यासमवेत सेल्फी काढून भाजप प्रवेशाची चाचपणी केली असल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू असतानाच आज राज्याचे माजी उपमुख्यंमत्री विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, किसनवीर सहकार साखर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे यांनी नितीन भरगुडे पाटील यांच्या पळशीतील निवासस्थानी “चाय पे चर्चा” रंगवत याला अधिकच रंग दिला.

राष्ट्रवादीतील नाराज मंडळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युती शासनाकडून ताकद दिली जात आहे. यासाठी भाजपकडून प्रवेशाच्या पायघड्या घातल्याची चर्चा केली जात आहे. यावेळी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर जाधव, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे माजी उपाध्यक्ष सिध्देश्‍वर राऊत, समता परिषेदेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, वडगांवचे माजी सरपंच शिवाजी पवार, अशेक धायगुडे, पळशीचे सरपंच अमोल भरगुडे, राजेंद्र शिंदे यांसह तालुक्‍यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)