विविधा: मोहन वेल्हाळ

माधव विद्वांस

मोहन वेल्हाळ यांचा जन्म 23 मे 1933 रोजी झाला. आजच्या संगणकाच्या जमान्यात प्रिंटिंग प्रेसमधील (मुद्रणालय) खिळे जुळविणे वगैरे प्रकार इतिहासजमा झाले आहेत. एखादा चित्रपट किंवा नाटकात पडद्यामागे काम करणारे अनेक कलाकार असतात. त्यांची नावे प्रेक्षकांसमोर येत नाहीत त्याचप्रमाणे एखाद्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामागेही अनेकांचे योगदान असले तरी प्रकाशक, लेखक आणि प्रस्तावना लिहिणारे यांचेच नाव पुढे असते. मात्र, वेल्हाळांच्या सारखे मुद्रितशोधक या मागे या आधुनिक काळातही असतातच. पूर्वी लेखक प्रकाशकांकडे हस्तलिखित पाठवीत असत. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होत असे.

पूर्वी या क्षेत्रामधे मनोहर बोर्डेकर, मोहन वेल्हाळ अशा काही तज्ज्ञ मंडळींचा लेखकांनाही आधार वाटत असे. ह्या सगळ्यांचा मराठी भाषेचा, साहित्याचा अभ्यास असे. त्याकाळी ब्लॉकने चाररंगी छपाई करताना अतिशय कौशल्य लागत असे. मोहन वेल्हाळ मुद्रितशोधन तज्ज्ञ असल्याने, कोणताही ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व परिपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे. “श्रीमानयोगी’, “रुचिरा’, “स्वामी’, “राधेय’ या पुस्तकांची संपूर्ण निर्दोष पुनर्निमिती त्यांनी केली. पुस्तकाचे स्क्रिप्ट हाती आल्यावर लेखकाचा आशय, वाचकांची काय प्रतिक्रिया येऊ शकेल, याची उत्तम जाण त्यांना होती. पुस्तकातील आशय महत्त्वाचा असला तरी मांडणी करण्याची जबाबदारी प्रकाशकाकडे यायची. कारण शेवटी पुस्तकाचे मार्केटिंग त्यालाच करायचे असते व यासाठी प्रेसमधील मुद्रितशोधकावर अधिक जबाबदारी येऊन पडत असे. हे काम मोहन वेल्हाळ लीलया पार पाडत असत.

त्यांचा साहित्याचा अभ्यास होता. व्याकरण व शुद्धलेखन या गोष्टीही बारकाईने ते पारखून घेत. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठाचा कलात्मक दर्जाही बघावा लागत असे. हल्ली सॉफ्टकॉपी तयार असल्यावर त्याची लिपी व लिपीचा आकार बदलणे शक्‍य झाले आहे. चुका दुरुस्त करणेही सोपे झाले आहे. काही भाषांमधील चुका संगणक दाखवितो. या गोष्टी पूर्वी शक्‍य नव्हत्या. खिळे जुळविण्याचे क्‍लिष्टकाम पूर्वी करावे लागे. एक पान झाल्यावर त्याची नमुना प्रिंट घेऊन त्यातील चुका व मांडणी यावर वेल्हाळ काम करीत असत. ते उत्तम अनुवादक होते. हिंदुस्थानच्या फाळणीवर अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. गुलजार यांनी त्यांच्या प्रभावी उर्दूमधून यावर लिहिलेल्या “रावीपार’ या कथासंग्रहाचे मोहन वेल्हाळ व त्यांचे सहकारी विजय पाडळकर यांनी सुरेख अनुवाद केला आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या कथांचा हा पहिलाच कथासंग्रह. “रावीपार’ यात एकूण 27 कथा आहेत.

गूढकथा लेखक नारायण धारप, तसेच कै. गो. नि. दांडेकर यांच्याशी त्यांचा सतत संपर्क असे. ते गोनिदांच्या बरोबर अनेक ऐतिहासिक ठिकाणी गेले होते. रुचिराच्या प्रसिद्ध लेखिका कमलाबाई ओगले त्यांच्याबद्दल म्हणत, मोहन वेल्हाळ व उदय बांदवडेकर यांचा उल्लेख “ऋणनिर्देशनात’ केल्याशिवाय भागणारच नाही. वेल्हाळ स्वतः लेखक होते. त्यामुळे लेखाचा आशय त्यांच्या लगेचच ध्यानात येत असे. त्यामुळे त्यांचे काम अधिक प्रभावीपणे होत असे. मुद्रितशोधक म्हणजे काय? हे अनेकांना माहीतही नाही. आज त्यांची ओळख देताना पुस्तक प्रकाशनापूर्वी किती अवघड प्रक्रियेतून जात हे वाचकांना समजून येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)