प्रासंगिक : “गोवा मुक्‍ती’चे लढवय्ये मोहन रानडे यांच्या सुटकेचा सुवर्ण महोत्सव

-शांताराम वाघ

आज 25 जानेवारी. याच दिवशी पोर्तुगालच्या तुरुंगातून 14 वर्षाच्या तुरूंगवासाच्या शिक्षेतून मोहन रानडे यांची 1969 साली सुटका झाली व त्यांनी स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. 26 जानेवारीला त्यांना रोममध्ये मोकळा श्‍वास मिळाला व आनंदाने त्यांनी हा दिवस रोममध्ये साजरा केला होता.

मोहन रानडे यांचा जन्म 1929 साली सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतीतील पारतंत्र्यांत असलेल्या गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्‍तीसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे ते एक प्रमुख नेते होते. त्यांनी व्यक्‍तिगत पातळीवर व आझाद गोमंतक दलाच्या माध्यमातून गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशाही पत्करला. सशस्त्र बंड उभारून त्यांनी 1955 मध्ये गोव्यातील बेत्ती येथील पोलीस चौकीवर हल्ला केला. त्यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांना पोर्तुगाल सरकारने अटक केली व त्यांत त्यांना 26 वर्षांची तुरूंगवासाची जबर शिक्षा झाली. त्यामध्ये एकांतवासाच्या सहा वर्षाच्या शिक्षेचाही समावेश होता, त्यानंतर त्यांची रवानगी पोर्तुगालमध्ये लिस्बन येथे झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 1962 मध्ये भारत सरकारच्या लष्करी कारवाईनंतर 450 वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवा स्वतंत्र झाला. मोहन रानडे यांची सुटका त्याचवेळी होईल अशी अपेक्षा होती. तथापि ती होऊ शकली नाही. त्यावेळी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत त्यांच्या सुटकेसाठी आवाज उठविला होता. महाराष्ट्रात संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली “मोहन रानडे विमोचन समिती’ही स्थापन झाली होती. या समितीनेही त्यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न केले. त्यावेळी तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. आण्णादुराई यांनी पोप पॉल यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेऊन रानडेंच्या सुटकेची मागणी केली होती. पोपनी हस्तक्षेप केल्यानंतरच रानडे यांची पोर्तुगालच्या तुरूंगवासातून सुटका झाली.

मोहन रानडे यांचे आदर्श गणेश दामोदर सावरकर व विनायक दामोदर सावरकर होते. सावरकरांची त्यांनी तरुण वयांत भेटही घेतली होती. पोर्तुगालमधील सुटकेनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. गोवा येथील रेड क्रॉस सोसायटीचे ते पाच वर्षे चेअरमन होते. गोवा सरकारच्या 1986 च्या “गोवा भूषण’ पुरस्काराचे ते मानकरी होते. जन्मभूमी सांगलीत त्यांचा “सांगली भूषण’ पुरस्कारांने 2006 साली गौरव झालेला होता. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2001 साली “पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

मोहन रानडे यांनी त्यांचे आत्मचरित्र “सतीचे वाण’ या नावाने लिहिले आहे. त्याची इंग्रजी आवृत्तीही स्‌”ट्रगल अनफिनिश्‍ड’ या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. पोर्तुगाल भाषेतही ते प्रसिद्ध झाले आहे. मोहन रानडे यांनी पुण्यात स्वामी विवेकानंद जीवनज्योत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान दिले आहे. आज त्या संस्थेचे ते अध्यक्ष असून त्यांनी अनेक गरीब व वंचित मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचा भरीव हात दिला आहे.

वयाच्या 90 व्या वर्षातही ते सामाजिक कार्य करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट व त्यांची झालेली चर्चा, शहीद भगतसिंगाच्या आईची भेट व त्यावेळी त्यांचे झालेले संभाषण, त्यांना मिळालेली अत्यंत अवघड अशी एकांतवासाची शिक्षा या गोष्टीबद्दल त्यांच्या तोंडून हे सारे प्रसंग ऐकतांना रोमांच उभे राहतात. आज मोहन रानडेंच्या सुटकेला 50 वर्षे होत आहेत.

मोहन रानडेंना परमेश्‍वराने दीर्घायुष्य द्यावे हीच प्रार्थना…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)