पुणे –“लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पुणेकरांमधून अडीच वर्षे गायब झालेले मोहन जोशी पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाट्टेल ते बोलतात. पुणेकरांनी नाकारूनही जनता सोबत असलेल्या भाजपवर आणि नेत्यांवर काहीही बोलतात. पुणेकर संकटात असताना आम्ही न डगमगता पुणेकरांच्या सेवेत होतो, तेव्हा मोहन जोशी घरात बसले होते. त्यामुळे “वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या मोहन जोशींनी आधी पुणेकरांच्या मदतीसाठी घराबाहेर पडावे’, अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माजी आमदार आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर केली.
“सीरम’चे संस्थापक सायरस पूनावाला यांनी पुणे शहराला विशेष प्रमाणात लस देण्यासाठी केंद्राने परवानगी दिली नसल्याचा दावा नुकताच केला होता. त्याचाच आधार घेऊन कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुणे भाजपवर निशाणा साधत, “पूनावाला यांचे ऐकून भाजपचे नेते हलतील का?’ असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पुणे शहराला लस मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या महापौर मोहोळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, मोहन जोशींनी आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडावे, असा खरमरीत टोला हाणून महापौर मोहोळ पुढे म्हणाले, “मोहन जोशी शहरातील ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि पुणेकरांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून आरोप करू नयेत.’