Bangladesh Hindu | बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अल्पसंख्याकांवरील होत असलेल्या अत्याचारावरून अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोहम्मद युनूस हे अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेख हसीना यांनी न्यूयॉर्कमध्ये ऑनलाइन आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना युनूस यांच्यावर ‘नरसंहार’ केल्याचा आणि हिंदूंसह अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शेख हसीना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी शेख हसीना म्हणाल्या की, “५ ऑगस्ट रोजी माझी आणि माझ्या बहिणीच्या हत्येचा कट रचला गेला होता. जशी १९७५ मध्ये माझे वडील शेख मुजीब उर रहमान यांना मारण्यात आले, तसाच कट रचण्यात आला होता. मोहम्मद युनूस सत्तेचे भुकेले आहेत म्हणून त्यांना धार्मिक स्थळे हल्ल्यांपासून वाचवता येत नाही”, असे गंभीर आरोप शेख हसीना यांनी केले.
या नरसंहाराचे मास्टरमाईंड मोहम्मद युनूस
“आज माझ्यावर नरसंहाराचा आरोप केला जात आहे. खरंतर युनूस यांनी खूप विचारपूर्वक नरसंहार केला आहे. या नरसंहाराचे मास्टरमाईंड विद्यार्थी समन्वयक आणि युनूस आहेत. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन कुणालाही सोडलं जात नाहीये. ११ चर्च तोडण्यात आले आहेत. मंदिरं आणि बौद्ध प्रार्थनास्थळे तोडण्यात आली आहेत. हिंदुंनी विरोध केला तर इस्कॉन नेत्याला अटक करण्यात आले”, असे शेख हसीना म्हणाल्या.
अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले
ढाकातील सध्याचे सत्ताधारी सरकार अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन – कोणालाही सोडले गेले नाही. अकरा चर्च पाडण्यात आल्या आहेत, मंदिरे आणि बौद्ध मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. अल्पसंख्याकांवर हे अत्याचार का होत आहेत? त्यांच्यावर का अत्याचार केले जात आहेत आणि त्यांच्यावर हल्ले का केले जात आहेत? आता लोकांना न्याय मिळण्याचा अधिकार नाही, ” असे हसिना म्हणाल्या.
ढाका येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानावर ५ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “सशस्त्र आंदोलकांना गणभवनच्या दिशेने पाठवण्यात आले होते. जर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला असता, तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. पण, मला तिथून निघून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मला राजीनामा द्यायलाही वेळ मिळाला नाही. हिंसाचार थांबवण्याच्या उद्देशाने आपण ऑगस्टमध्ये बांगलादेश सोडले होते, पण तसे झाले नाही. मी सुरक्षा रक्षकांना सांगितलं की, काहीही झालं तरी गोळ्या चालवू नका”, असेही त्यांनी सांगितले.
ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होत्या.
हेही वाचा:
Pan Card : आता 2 मिनिटात मिळणार ई-पॅन कार्ड; घरबसल्या ‘या’ प्रकारे करा अर्ज