बीसीसीआयची शिष्टाई
कोलकाता – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा अमेरिकन व्हिसा नामंजूर करण्यात आला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेल्या मध्यस्थीमुळेच त्याला हा व्हिसा देण्यात आला.
व्हिसाकरिता पोलिसांकडून ना हरकत दाखला देण्याची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्याकडून या दाखल्याबरोबर देण्यात आलेली माहिती अपुरी होती. त्यामुळे त्यास व्हिसा देण्यास अमेरिकन दूतावासने नकार दिला. शमीने त्यानंतर बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीकडे (सीओए) संपर्क साधला व याबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केली.
शमी याने विश्वचषक स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे बहुउद्देशीय व्हिसा आहे व त्यानुसार त्याला अमेरिकन व्हिसा देण्यात यावा अशा आशयाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोरी यांनी अमेरिकन दूतावासाकडे पाठविल्यानंतर शमीला व्हिसा मिळाला.