Mohammed Shami 5 Wickets haul in Ranji Trophy : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये आपल्या गोलंदाजीने आग ओकत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शमीने सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स (फायफर) घेत निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. शमीच्या या भेदक माऱ्यामुळे बंगालचा संघ आता सर्व्हिसेसवर डावाने विजय मिळवण्यापासून अवघे दोन पाऊल दूर आहे. मैदानात शमीचे वादळ; १४ व्यांदा पूर्ण केला ‘फायफर’ बंगाल क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या ‘एलिट ग्रुप-सी’ सामन्यात बंगालने सर्व्हिसेसला फॉलोऑन दिला होता. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या सर्व्हिसेसच्या फलंदाजांना शमीने आपल्या स्विंग आणि वेगाने पुरते हतबल केले. शमीने एस.जी. रोहिल्ला, रवी चौहान, रजत पालीवाल, विनीत धनकर आणि ए.पी. शर्मा या पाच फलंदाजांना बाद करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले १४व्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्व्हिसेसने ८ बाद २३१ धावा केल्या होत्या. सीझनमध्ये २७ विकेट्स; शमीचा ‘फॉर्म’ जबरदस्त मोहम्मद शमी या रणजी हंगामात बंगालसाठी सर्वात मोठा मॅचविनर ठरत आहे. त्याची या सीझनमधील आकडेवारी त्याच्या फिटनेसची साक्ष देते. त्याने ५ सामन्यात १७.०३ च्या सरासरीने एकूण २७ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या सामन्यातील पहिल्या डावातही शमीने २ महत्त्वाचे विकेट्स घेतले होते. आता बंगालला हा सामना डावाने जिंकण्यासाठी केवळ २ विकेट्सची गरज आहे. हेही वाचा – IND U19 vs NZ U19 : इंडियाच्या यंग ब्रिगेडने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत साधली विजयाची हॅट्ट्रिक! अम्ब्रीशच्या फिरकीने वेधलं लक्ष टीम इंडियात पुनरागमनाचे संकेत? मोहम्मद शमी सर्व्हिसेसविरुद्ध ५ विकेट्स घेत पुनरागमनासाठी सज्ज गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे विकेट्स घेत आहे, ते पाहता आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. बंगालने या हंगामात आतापर्यंत ५ पैकी ३ सामने जिंकले असून, या चौथ्या विजयानंतर त्यांचा पुढच्या फेरीतील (नॉकआऊट) प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे.