नवी दिल्ली : ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
८०० वर्षांच्या मुघल साम्राज्यात अनेक बादशाहा होऊन गेलेत. त्यांचा इतिहास वाचला तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, हे दिसून येईल. त्यांनी धर्माच्या नावावर कोणतंही काम केलं नाही. अशी अनेक उदाहरणं देता येईल. मोहम्मद गझनीबद्दल लोकं म्हणतात, की त्याने सोमनाथ मंदिर तोडले.
मात्र, इतिहास असं सांगतो की तेथील काही लोकांनी आस्थेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार गझनीकडे केली होती. त्यानंतर गझनीने मंदिर परिसराची पाहणी केली. जेव्हा त्याला लोकांची तक्रारी खऱ्या आहेत, याची खात्री पटली, तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. गझनीने तिथे होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया रशीदी यांनी दिली.
यापूर्वीही रशिदी यांनी राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केलं होते. आमच्या भावी पिढ्या राम मंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुस्लीम शांत आहेत. मात्र, येत्या काळात इतिहास लिहिला जाईल, असे ते म्हणाले होते.