हैदराबाद – भ्रष्टाचाराचे आरोप व संघटनेच्या घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप ठेवत हैदराबाद क्रिकेट संघटनेने माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन याची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच त्याला “कारणे दाखवा’ नोटीसही पाठवली असून संघटनेच्या आरोपांवर खुलासा मागितला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो अध्यक्षपदावरून निलंबित असेल. त्याचबरोबर त्याचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. अझरुद्दीनवर मनमानी निर्णय घेणे, हितसंबंधांची माहिती न देणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
अझरुद्दीन विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला “कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अझरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य आहे. हा क्लब बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. याबाबतची माहिती अझरुद्दीनने असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
अझरुद्दीनवर 2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आला. 2012 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. तीन वर्षांपूर्वी अझर हैदराबाद संघटनेचा अध्यक्ष बनला होता. दरम्यान, अझरने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून याबाबत कायदेशीर लढा देणार असल्याचेही सांगितले.