पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकर नागरिकांचे प्रलंबित प्रश्न आणि समस्यांबाबत पुणे महापालिका मुख्यालय आणि विविध क्षेत्रीय कार्यालये यांच्या मध्ये समन्वय आवश्यक आहे.
क्षेत्रीय अधिकारी आणि महापालिका सहायक आयुक्त यांच्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक संयुक्त मासिक सभा घेणे नुकतेच बंधनकारक केले गेले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला सभा सातत्याने घ्याव्यात, अशी मागणी सहकारनगर नागरिक मंचने केली आहे.
स्थानिक कामे आणि नागरी प्रश्नांचा निपटारा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होत नसल्यामुळे नागरिकांना महापालिका मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागते. हे प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला सभा घेणे, हा एक प्रभावी उपाय आहे.
या सभांद्वारे नागरिकांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडायला आणि त्यांचा पाठपुरावा करायला एक व्यासपीठ उपलब्ध होते. पण अनेकवेळा नवनवीन कारणे देऊन महापालिका क्षेत्रीय कार्यालयातर्फे या सभा घेतल्याच जात नाहीत, असा नागरिकांचा अनुभव आहे.
या सभा जर सातत्याने आणि प्रभावीपणे घेतल्या गेल्या तर नागरिकांना महापालिका मुख्यालयाकडे जावे लागणार नाही, असे मंचाचे म्हणणे आहे. या सभा प्रभावी होण्यासाठी अधिकाधिक नागिरकांनी यांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहकारनगर नागरिक मंचातर्फे करण्यात आले आहे.