मोगॅम्बो खुश हुवा! अमरीश पुरींच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

मोगॅम्बो खुश हुवा! हा डायलॉग उच्चारला की आठवण होते ती अमरीश पुरी यांची. अभिनेता म्हणून अमरीश पुरी म्हणजे साधेपणा, कामातील वक्तशीरपणा याचा सुंदर मिलाफ, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. अशा या महानायकाच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे.

१९५३ साली अमरीश पुरी मुंबईत आले. पण अमरीश पुरी स्क्रीन टेस्टमध्ये अपात्र ठरवले जायचे. त्यांचं रंग रुप बघून त्यांना कोणी काम देत नव्हतं. फार दिवस भावाकडे ओझं नको म्हणून त्यांनी नोकरी करायला सुरूवात केली. कधीकाळी त्यांनी घरोघरी जाऊन माचिस विकली तर कधी कारकुनी कामं केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी केली. काही वर्षांनी अमरीश पुरी यांची ओळख रंगमंचाचे सम्राट मानल्या जाणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांच्याशी झाली. ज्या चेहऱ्याला बघून अनेकांनी नाकारलं त्या चेहऱ्याला पहिल्याच नजरेत रंगमंचाचे गुरू अल्काझी यांनी ओळखलं. पहिलं इंग्रजी नाटक अमरीश पुरी यांना मिळालं. सिनेमातलं करीयर सुरू होण्याच्या १० वर्ष आधी त्यांना पहिलं नाटक मिळालं.

रंगमंच्यावरच्या पहिल्या नाटकात मात्र अमरीश पुरी यांच्या अभिनयाची कसोटी लागली. धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या नाटकात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली. अंध व्यक्तीचा अभिनय असल्यानं त्यांना एकदाही पापणी मिटण्याची परवानगी नव्हती. तेव्हा रंगमंच हा उघडा असायचा त्यामुळे हवा आणि डास यांचा उच्छाद तर होताच पण अशा परिस्थितीत एकदाही पापणी न मिटता लांब संवाद त्यांनी लिलया पेलले. १९६७ साली त्यांना मराठी सिनेमात पहिल्यांदा काम मिळालं. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. १९७१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी १९७० मध्ये त्यांचा प्रेम पुजारी हा हिंदी सिनेमा आला. नाटकात भूमिका गाजत असल्या तरी रंग रूप बघणाऱ्या बॉलिवुडमध्ये अमरीश पुरी यांना संधी मिळत नव्हती. १९७० मध्ये म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर त्यांना रोल मिळू लागले मात्र त्यात फारसं काही करण्याची संधी त्यांना मिळाली नाही.

गोविंद निहलानी यांच्या अर्धसत्य सिनेमात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. इथूनच पुढे अमरीश पुरी पर्वाला सुरूवात झाली. कमर्शियल चित्रपटात अमरीश पुरी यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली ती १९८१ साली आलेल्या ‘हम पाँच’ या सिनेमानं. त्यानंतर आलेल्या ‘विधाता’ आणि ‘हिरो’ या चित्रपटांनी त्यांना खलनायक म्हणून ओळख दिली. प्राण यांच्यासारखा बंद गळ्याचा सूट घालून हंटर फिरवणारा खलनायक असो वा अमजद खानचा गब्बर असो सर्वांचं मार्केट डाऊन करून अमरीश पुरी यांचा खलनायकी काळ ८० च्या दशकात सुरू झाला. अनेक खलनायक त्यावेळी स्पर्धेत होते पण अमरीश पुरी यांच्यासोर एकही टिकला नाही. मिस्टर इंडिया मधल्या मोगॅम्बोनं अमरीश पुरी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. ती अदाकारी बघून प्रेक्षकही म्हणायचे. “मोगॅम्बो खुश हुआ…”

शाम बेनेगल, गोविंद निहलानी, शेखर कपूर, सुभाष घई, प्रियदर्शन, राकेश रोशन, राजकुमार संतोषी अशा अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. ज्या सीनमध्ये अमरीश पुरी असायचे तो सीन फक्त त्यांचा असायचा. मग समोर कितीही मोठा कलाकार असो, अमरीश पुरींसमोर करण्यासारखं त्याच्याकडे काही उरायचंच नाही. ८० आणि ९० च्या दशकात अमरीश पुरी यांचे एकामागोमाग अनेक हिट सिनेमे आले. फूल और कांटे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, राम लखन, सौदागर, करण अर्जुन, घायल, गदर, दामिनी, आक्रोश, अर्द्धसत्य, भूमिका, चाची ४२०, घातक, हीरो, कोयला, मंथन, मेरी जंग, मि. इण्डिया, मुस्कराहट, नगीना, फूल और कांटे, राम लखन, ताल, त्रिदेव, विधाता अशी एक ना अनेक नाव घेता येतील. अमरीश पुरी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की बायका त्यांचा अक्षरशः द्वेष करायच्या. अमरीश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)