नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या निवासस्थानाला दिलेली भेट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या भेटीवर विरोधी पक्षांनी आणि काही वकिलांनी आक्षेप घेतला आहे. तर, भेटीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. मोदींनी बुधवारी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, त्या भेटीवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संबंधित भेटीवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
राज्यघटनेच्या रक्षणकर्त्यांनी राजकीय नेत्यांची भेट घेतल्यास जनतेच्या मनात शंका निर्माण होतील, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. कुठल्याही संस्थेचे स्वातंत्र्य ठळकपणे दिसायला हवे. गणेश पूजा ही बाब अतिशय खासगी स्वरूपाची आहे. त्यासाठी समवेत कॅमेरा नेण्यात आला. त्यातून जो संदेश देण्यात आला आहे; तो असुखावह आहे, अशी टिप्पणी राजदचे नेते मनोज झा यांनी केली.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात अधिकारांची विभागणी झाली आहे. त्या बाबीशी सरन्यायाधीशांनी तडजोड केल्याचे वाटते. त्यांच्या स्वातंत्र्याविषयी वाटणारा सर्व विश्वास आता हरपला आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने निषेध नोंदवायला हवा, असे भाष्य त्यांनी केले.
मोदींनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाला भेट देण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. आपला देश लोकशाही व्यवस्थेनुसार चालतो. संबंधित व्यवस्थेत सहकार्य, ताळमेळ या जोरावरच देश पुढे जात असतो. लोकशाहीतील दोन स्तंभांच्या प्रमुखांनी सौहार्दपूर्ण वातावरणात एकमेकांची भेट घेण्यात काहीच गैर नाही.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात इफ्तार पार्ट्यांचे आयोजन व्हायचे. त्या पार्ट्यांना तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित असायचे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी मोदींनी गणेश पूजेत सहभागी होण्याला विरोध होता कामा नये. मोदींच्या भेटीला विरोध करणाऱ्यांचा खरा विरोध गणेश पूजेला दिसतो, असा शाब्दिक प्रतिहल्ला पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.