मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणे ही ईश्वरी योजनाच – उद्धव ठाकरे

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांची नवी इनिंग आजपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवड होण्याबाबत ‘ईश्वरी योजना!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

या अग्रलेखातून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी स्मुतीसुमनांच्या वर्षाव केला आहे. ‘देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला. दिल्लीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे.’

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. त्याशिवाय, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याबाबतही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)