महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर आता लढतींचं चित्र स्पष्ट होत आहे. प्रचाराचे फटाके फोडण्यास लवकरच सुरुवात होणार असून, महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सर्वात मोठे स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरतील.
पंतप्रधान मोदींच्या ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या १० प्रचारसभांचे महाराष्ट्रात नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी धुळे आणि नाशिक येथे त्यांच्या सभांचे आयोजन आहे, तर दुसऱ्या दिवशी अकोला आणि नांदेडमध्ये सभा होणार आहेत. १२ नोव्हेंबरला चंद्रपूर, सोलापूर आणि पुणे येथे सभांचे आयोजन आहे.
शेवटच्या टप्प्यात १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नवी मुंबई येथे सभा घेतल्या जातील.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, प्रत्येक सभा १५ ते २० मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करेल आणि तेथील सर्व उमेदवार सभास्थळी उपस्थित राहतील.
दहा सभांचे नियोजन असले तरी, यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध केंद्रीय मंत्र्यांचाही प्रचारात सहभाग असणार आहे, ज्यामुळे भाजपची प्रचारयंत्रणा अधिक मजबूत होणार आहे.
महाविकास आघाडीचीही जोरदार मोहीम
दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षांनीही आपली प्रचार मोहीम तीव्र केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी संयुक्त प्रचारसभा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे प्रमुख नेते राज्यभर दौरे करणार आहेत. महाविकास आघाडीने देखील आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
मनसेचे राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील स्वतंत्रपणे प्रचार करत आहेत.