भारत माता की जय घोषणेवरून मोदींचे मनमोहनसिंग यांना टोमणे

कॉंग्रेसनेही दिले प्रत्युत्तर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत माता की जय या घोषणेवरून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत लक्ष्य केले. भारत माता की जय अशा घोषणेचे गैरवापर केला जात असल्याची टीका मनमोहनसिंग यांनी अलिकडेच केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, भारत माता की जय या घोषणा देण्यात काही जणांना आज अडचण वाटत आहे. मनमोहनसिंग यांचे नाव त्यांनी घेतले नाही, पण या देशप्रेमाची साक्ष देणाऱ्या घोषणा देण्यात काही जणांना लाज का वाटावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गेल्या आठवड्यात एका पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना मनमोहनसिंग यांनी भारत माता की जय या घोषणेचा गैरवापर केला जात असल्याचे नमूद करीत त्या घोषणेचा वापर एका समुदायाला धमकावण्यासाठी केला जात आहे असा आरोप केला होता. भारतीय जनता पक्षाकडून भारत माता की जय या घोषणेचा सतत वापर केला जात असून काही विशिष्ट घटकांवर ही घोषणा देण्याची सक्ती केली जात आहे. त्यावरून कॉंग्रेस व भाजप मध्ये जोरदार वादंग सुरू असते.

दरम्यान कॉंग्रेसने मोदींच्या आजच्या वक्तव्याचाही जोरदार समाचार घेतला. पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी यावर प्रतिक्रीया देताना नमूद केले आहे की, मोदींनी मनमोहनसिंग यांच्या सारख्या ज्येष्ठ व सार्वजनिक ठिकाणी नेहमीच सभ्यता पाळणाऱ्या नेत्याची खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांनी नेमकी काय विधाने केली ते समजून घेतले पाहिजे.

आपल्या सर्वांसाठीच भारत माता आदरस्थानी राहिली आहे आणि देशाचा तिरंगा आपल्या सर्वांसाठीच प्रिय राहिला आहे असे मनमोहनसिंग यांनी नमूद केले आहे तो भाग त्यांनी लक्षात घेतलेला नाही असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.