न्यूयॉर्क – रशिया आणि युक्रेन दरम्यान कायमस्वरूपी शांतता नांदावी याकरता मध्यस्थी करण्याकरता एक समिती स्थापन केली जावी आणि त्या समितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंटोनिओ गुटेरस यांचा समावेश केला जावा असा प्रस्ताव मेक्सिकोकडून देण्यात आला आहे.
मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्सेला लुईस एबरार्ड कॅसाबो यांनी हा प्रस्ताव दिला आहे. न्यूयॉर्क येथे युक्रेन संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी प्रस्ताव मांडला आहे. काही दिवसांपूर्वीच उझबेकिस्तानच्या समरकंद येथे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची चर्चा झाली होती. तेव्हा मोदी यांनी सध्याचे युग हे युध्दाचे युग नाही असा सल्ला पुतीन यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोच्या या प्रस्तावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या त्या सल्ल्याचे अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांनी स्वागत केले आहे. शांतता निर्माण करण्यासाठी जगाने जास्तीत जास्त प्रयत्नांवर भर देणे आवश्यक असल्याचे मेक्सिकोला वाटते असेही त्या देशाच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.