अमिरातीच्या सर्वोच्च सन्मानाने मोदींचा गौरव

आबु धाबी (संयुक्‍त अरब अमिराती) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्‍त अरब अमिरातीमधील “ऑर्डर ऑफ झायेद’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. भारत आणि संयुक्‍त अरब अमिरातीमधील संरक्षण संबंध दृढ करण्यामधील महत्वाच्या भूमिकेबद्दल मोदींना या सन्मानाने गौरवण्यात आले. यापूर्वी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, ब्रिटनच्या महाराणी क्‍वीन एलिझाबेथ द्वितीय आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना या सन्मानाने गौरवण्यता आले आहे.

अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांच्या हस्ते आबुधाबीमधील राजप्रासादामध्ये झालेल्या समारंभात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी या पुरस्कारासाठी संयुक्‍त अरब अमिराती सरकारचे आभार मानले आहेत. सुमारे 1.3 अब्ज भारतीयांच्या क्षमता आणि कौशल्यांना आपण हा पुरस्कार समर्पित करत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्‍त केली. हा पुरस्कार म्हणजे भारताच्या सांस्कृतिक नितीचा गौरव आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

संयुक्‍त अरब अमिरातीचे संस्थाप्क शेख झायेद बिन सुलतान अल नह्यान यांच्या नावे हा पुरस्कार दिला जतो. शेख झायेद यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षीच हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे, हा चांगला योगायोग आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमीरात दरम्यान सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक संबंधांद्वारे उत्साहवर्धक, निकटचे आणि बहुपक्षीय संबंध निर्माण झाले आहेत. मागील ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या पंतप्रधानांच्या “युएई’ दौऱ्यादरम्यान व्यापक रणनीतिक भागीदारीत हे संबंध अधिकच उंचावले गेले होते, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संयुक्‍त अरब अमिरातीने एप्रिल महिन्यात पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला होता. “माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे समर्थ भारताशी आमचे ऐतिहासिक आणि व्यापक धोरणात्मक संबंध आहेत, असे युवराजांनी एप्रिल महिन्यातल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते.

“युएई’ हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांमध्ये 60 अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापारी संबंध आहेत. “युएई’कडून होणाऱ्या क्रूड तेलाच्या निर्यातीत भारताच चौथा क्रमांक आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×