दिल्लीवार्ता – …तरी मोदी यांचा सामना प्रियांका यांच्याशीच

वंदना बर्वे

कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा सामना त्यांच्याशीच आहे. कारण वाराणसी हा मतदारसंघ पूर्व यूपीत मोडतो आणि प्रियांका गांधी याच भागाच्या प्रभारी आहेत. यास कॉंग्रेसचा मुत्सद्दीपणासुद्धा म्हटला जाऊ शकतो. पूर्व यूपीत भाजपच्या जागा निवडून आल्या तर खापर कॉंग्रेसच्या उमेदवारांवर फुटेल. मात्र, कॉंग्रेसची भरभराट झाली तर तो पराभव पंतप्रधानांचा असेल आणि करिश्‍मा प्रियांका यांचा!

कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी देणार? या प्रश्‍नाची उत्कंठा आता संपली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वाराणसीतून प्रियांका गांधी-वढेरा यांना मैदानात उतरविणार काय? या प्रश्‍नाने राजकीय विश्‍लेषकांची उत्सुकता शिगेला पोहचविली होती. वाराणसीत नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियांका गांधी असा सामना झाला तर या निवडणुकीला वेगळे स्वरूप आले असते आणि संपूर्ण देशाचे लक्ष वाराणसीवर टिकले असते. मात्र, ही फॅंटसी आता संपली आहे.

कॉंग्रेसनं अजय राय यांना वाराणसीतून रिंगणात उतरविले आहे. 2014 मध्येसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राय हेच उभे होते. हा सामना आता एकतर्फी दिसत असला तरी ही वरवरची बाजू झाली. मोदी यांच्या विरोधात राय दिसत असले तरी खरा सामना हा मोदी आणि प्रियांका गांधी यांच्यातच आहे.कारण राहुल गांधी यांनी प्रियांका यांना महासचिव बनविताच पूर्व यूपीच्या प्रभारी बनविले. वाराणसी हा मतदारसंघ पूर्व यूपीत मोडतो. या भागात 35 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत आणि या सर्व ठिकाणी “पंजा’ला निवडून आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर आहे. थोडक्‍यात, हा सामना “गंगापुत्र’ आणि “गंगापुत्री’ यांच्यात आहे.

नरेंद्र मोदी स्वतःला गंगापुत्र म्हणवतात तर प्रियांका गांधी यांच्या मते त्या गंगापुत्री आहेत. निवडणुकीचा प्रचार करताना दोघेही एकमेकांवर शरसंधान साधतात. गंगापुत्र आणि गंगापुत्रीचा सामना रंगल्यामुळे सुरुवातीला प्रियांका वाराणसीतून लढणार की काय? अशी चर्चा रंगली होती. परंतु कॉंग्रेसने वाराणसीचा उमेदवार जाहीर केला आणि उधाण शांत झालं. मुळात प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी देण्याची चर्चा केवळ वातावरण तापवण्यासाठी होती. त्या चर्चेत तथ्य किंवा गांभीर्य नव्हते, असे अनेकांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी यांना लढविण्याचा सल्ला कुणीही दिला नसता किंवा दिला नसेल. कारण, ही खूप मोठी जोखीम ठरली असती. प्रियांका गांधी यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली असती आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा डाग पडला असता.

प्रियांका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे असेल तर त्यासाठी पर्यायी मतदारसंघ उपलब्ध आहेत. त्या रायबरेलीमधून लढू शकतात. मात्र, आता सोनिया गांधी येथील खासदार आहेत. फुलपूर हाही एक मतदारसंघ आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा मतदारसंघ किंवा असा कोणताही मतदारसंघ ज्या ठिकाणी त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागणार नाही.

प्रियांका गांधी यांचा 23 जानेवारीला सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आणि सोबतच पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर प्रियांका गांधी यांनी पहिले भाषण दिले ते नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा येथे झाली आणि येथेच प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. प्रियांका गांधी यांची सुरुवातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधाने झाली. अशा परिस्थितीत पक्षाने त्यांना उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

मात्र, भाषण आणि प्रतिक्रिया देणं वेगळी गोष्ट आहे आणि निवडणूक लढणं वेगळी. निवडणूक लढण्यासाठी जमिनीवर कार्यकर्त्यांची कुमक लागते. वाराणसीमध्ये कॉंग्रेसजवळ कार्यकर्त्यांची ती फळी नाही. सपा-बसपा यांच्या आघाडीमुळे कॉंग्रेसने प्रियांका यांना निवडणूक मैदानात उतरवलं नाही, असाही तर्क दिला जात आहे. समाजवादी पक्षाने वाराणसीतून शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे. सपा-बसपा महाआघाडी वाराणसीत उमेदवार उतरविणार की नाही? यावरही प्रियांका गांधी यांच्या लढण्याचा निर्णय अवलंबून होता. प्रियांका लढल्यास महाआघाडी उमेदवार उभा करणार नाही अशी एक चर्चा होती. परंतु सपाचा उमेदवार जाहीर झाला आणि सर्व शक्‍यता संपल्या.

2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस, सपा, बसपा आणि आम आदमी पक्ष वाराणसीतून मैदानात होता. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांना जवळपास 5.8 लाख मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते आणि त्यांना 2 लाख मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले कॉंग्रेसचे अजय राय यांना केवळ 75 हजार मते मिळाली होती. अशी पार्श्‍वभूमी असताना प्रियांका गांधी मैदानात उतरल्या असत्या तर हे समीकरण बदललं असतं का? असा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे. प्रियांका वाराणसीतून लढल्या असत्या तर कॉंग्रेसला नक्‍कीच फायदा झाला असता; परंतु निवडून येण्याची शक्‍यता फार कमी होती. प्रियांकांचा प्रभाव वाराणसीच्या आसपासच्या जौनपूर, मऊ आणि आजमगढ यांसारख्या जागी दिसला असता. मात्र, या छोट्या फायद्यांसाठी पक्षाला प्रियांका गांधी यांच्या रूपात मोठी किंमत चुकवावी लागली असती. प्रियांका गांधी पक्षाचा मोठा चेहरा आहे. त्या पक्षाचे भविष्य आहेत. त्यांचा चेहरा इंदिरा गांधींसारखा दिसतो. लोकांना त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचा पराभव व्हावा, हे पक्षाला कधीच मान्य होणार नाही. या निवडणुकीत प्रियांका यांच्यांमुळे पक्ष मजबूत झाला नाही तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात त्या नक्‍कीच यशस्वी ठरतील. याचा लाभ पक्षाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल.

भारतीय राजकारणात राजकीय पक्षांनी काही पथ्य पाळले आहेत. मोठ्या नेत्यासमोर तगडा उमेदवार न देण्याचे. कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती, राकॉं नेते शरद पवार, श्‍यामा प्रसाद मुखर्जी असो किंवा अटल बिहारी वाजपेयी या नेत्यांच्या विरोधात जो कोणी मुख्य विरोधी पक्ष असेल त्याने सुद्धा कधीही तगडा उमेदवार दिला नाही. ही मंडळी लोकसभेत निवडून आलीच पाहिजे, असा सर्व पक्षांचा आग्रह असायचा. किंबहुना, अटलबिहारी वाजपेयी लोकसभेची निवडणूक हरले तेव्हा कॉंग्रेसने त्यांना सर्व पक्षांच्या सहकार्याने राज्यसभेवर निवडून आणले होते. 1957 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे संसदेतलं भाषण ऐकून ते म्हणाले होते, हा तरुण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल.

नरेंद्र मोदी यांच्यापुढे प्रियांका गांधी यांना उमेदवारी न देऊन कॉंग्रेसने ही परंपरा जोपासली असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. अनुभवी नेते संसदेत राहणे ही देशाची गरज असते. दोन दिग्गजांचा सामना बघायला लोकांना आवडतो. परंतु उत्तम आणि मोठ्या नेत्यांनी संसदेत असायला पाहिजे. त्यांच्यामुळे लोकशाही बळकट होते. एक मात्र नक्‍की की, प्रियांका गांधी यांच्या सक्रियतेमुळे नरेंद्र मोदी यांच्या विजयावर खरेच फरक पडणार काय? हे आताच सांगता येणार नाही. परंतु यूपीतील बहुतांश जागांवर प्रियांका यांची जादू चालल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच खरे आहे. याची जाणीव भाजपलाही आहे. पूर्व यूपीतील बहुतांश मतदारसंघ ब्राह्मणबहुल आहेत. हाच वर्ग भाजपच्या पाठीचा कणा आहे. वाराणसीसुद्धा याच पूर्वचा भाग. याशिवाय गृहमंत्री राजनाथ सिंगसुद्धा याच भागात. शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना सपाने मैदानात उतरविले आहे. पूर्व यूपीत पराभव झाला तरी कॉंग्रेसकडे गमाविण्यासारखे काहीच नाही. परंतु भाजपला जर का दणका बसला तर बोटे पंतप्रधानांवर उठतील, एवढे नक्‍की!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.