खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातील संशयीत मोदींचे निकटवर्तीय; गृहमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई – सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अर्थसंकल्पातील तरतुदीवरून टीका टीप्पणी झाली. आज मात्र अधिवेशनात मनसुख हिरेन आणि खासदार मोहन डेलकर यांची संशयास्पद मृत्यू प्रकरणे गाजली. गृहमंत्री अनिल देशमुखांनी आक्रमक पावित्रा घेत खासदार डेलकर यांच्या मृत्यूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांचे नाव घेतले. त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी म्हटलं होतं की, मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव नसल्याचा दावा केला. फडणवीस यांचा हा दावा खोडून काढत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला.

खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते, असा दावा अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांचे सर्व दावे फेटाळून लावत महाविकास आघाडी सुडाचे राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या माध्यमातून मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं. ते पुढं म्हणाले की, डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेले प्रफुल्ल खेडा पटेल हे दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते, असं अनिल देशमुख यांनी सांगताच सभागृहात गदारोळ झाला. मात्र डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटी मार्फत होणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.