पुन्हा मोदी की सत्ता परिवर्तन? देशाचे सत्ताधीश ठरवण्यासाठी आज फैसला

नवी दिल्ली -जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या (गुरूवार) होणार आहे. त्यातून देशाचे सत्ताधीश ठरवण्यासाठीचा फैसला होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दुसरा कार्यकाळ लाभणार असल्याचे भाकीत केले आहे. मात्र, विरोधी पक्षांनी एक्‍झिट पोलचे अंदाज अमान्य केले आहेत. एनडीएला मोठा हादरा बसणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, एक्‍झिट पोलचे भाकीत खरे ठरणार की वेगळेच चित्र समोर येणार याविषयीचा निकालही मतमोजणीमुळे लागेल.

लोकसभेच्या 542 जागांसाठी 7 टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया 19 मे यादिवशी समाप्त झाली. सुमारे 90 कोटी पात्र मतदारांपैकी 67.11 टक्के जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळचे मतदान लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील उच्चांकी ठरले. ते मतदान एकूण 8 हजार 49 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. मागील निवडणुकीत भाजपने घवघवीत कामगिरी करताना एकट्याच्या बळावर बहुमताचा आकडा ओलांडला. त्या पक्षाने तब्बल 282 जागा पटकावल्या. तर नामुष्कीजनक पीछेहाट स्वीकाराव्या लागलेल्या कॉंग्रेसची नीचांकी कामगिरी नोंदली गेली. त्या पक्षाला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी ते पक्ष कशी कामगिरी करतात याबाबत मोठी उत्सुकता आहे.

मोदींचा करिष्मा आणि सरकारची उल्लेखनीय कामगिरी या जोरावर पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्‍वास एनडीएला वाटत आहे. तर वाढती बेरोजगारी, शेतीविषयक समस्या आणि अर्थव्यवस्थेची घसरण आदींमुळे भाजपबरोबरच एनडीएला फटका बसणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, देशातील जनतेचा कौल कुणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातूून समोर येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.