योगींना मोदींचा बूस्टर डोस; वाराणसीतील कार्यक्रमात केली प्रशंसा

वाराणसी – करोनाच्या दुसऱ्या लाटेतील ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल टीकेची झोड सहन करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बूस्टर मिळाला आहे. त्याचे कारण म्हणजे योगींची कदाचित उचलबांगडीही होऊ शकते अशी शक्‍यता वर्तवली जात असताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात जाऊन योगींचे कौतुक केल्यामुळे योगींचे स्थान घट्ट असल्याचा सुस्पष्ट संदेश दिला गेला आहे.

निमित्त होते मोदी यांच्या वाराणसी दोैऱ्याचे. आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटली. करोना काळात योगी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी योगींच्या कामगिरीची प्रशंसा केली.

देशात करोनाकाळात सर्वाधिक चाचण्या करणारे उत्तर प्रदेश हे सर्वात वरच्या क्रमांकाचे राज्य ठरल्याचा उल्लेखही यावेळी पंतप्रधानांनी आवर्जून केला. आज उत्तर प्रदेश हे संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण करणारे राज्यही बनलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेला यूपी सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळल्याचा दावा त्यांनी केला. करोना विषाणूच्या बदललेल्या आणि धोकादायक स्वरूपाने संपूर्ण ताकदीनिशी हल्ला केला होता; परंतु काशीसहीत उत्तर प्रदेशने संपूर्ण सामर्थ्यासहीत या संकटाचा सामना मोठ्या धैर्याने केला.

करोनाशी दोन हात करण्याचे उत्तर प्रदेशचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशी नगर आज पूर्वांचलचे सर्वात मोठे मेडिकल हब म्हणून समोर येत आहे. ज्या आजारांवर उपचार मिळवण्यासाठी कधी दिल्ली आणि मुंबईला जावं लागत होतं ते उपचार आज काशीत उपलब्ध आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

आज काशीत पंधराशे कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या विकासकामांचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. कधीही न थांबण्याचे उदाहरण काशीने समोर ठेवले. आता उत्तर प्रदेशात जवळपास साडेपाचशे ऑक्‍सिजन प्लान्ट उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. आज वाराणसीत ऑक्‍सिजन प्लान्टसचे लोकार्पण करण्यात आले. काशी मेडिकल इन्फास्ट्रक्‍चरमध्येही काही भर पडत आहे. आज महिला आणि मुलांच्या आरोग्याशी निगडीत नवे रुग्णालय काशीला मिळत आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.