नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची 23 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्यांसाठी मोदींची आजवरची यात्रा जिवंत प्रेरणा आहे, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली.
मोदींच्या यात्रेचा साक्षीदार बनणे ही माझ्या दृष्टीचे अतिशय भाग्याची बाब आहे. एक व्यक्ती आपले संपूर्ण जीवन राष्ट्रहित आणि जनसेवेसाठी कशाप्रकारे समर्पित करू शकतो ते दर्शवणारे प्रतीक म्हणून मोदींच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाकडे पहावे लागेल. आजवरच्या वाटचालीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, अशी सदिच्छा शहा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी मुल्याधारित राजकारणाचे उदाहरण घालून दिले.
स्वच्छ प्रतिमेसह कार्य करण्याची शैली त्यांच्याकडून सर्वपक्षीय नेत्यांनी शिकायला हवी, असे भाष्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. मोदींनी सर्वप्रथम 7 ऑक्टोबर 2001 यादिवशी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी 13 वर्षे ते पद सांभाळले. त्यानंतर 2014 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले.