नवी दिल्ली – आपल्या आगामी रोम दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांना भेटणार आहेत. मात्र ही भेट व्यक्तिगत असेल की शिष्टमंडळ पातळीवर असेल, हे अद्याप निश्चित नसल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या रोम दौऱ्याच्या नियोजनाबाबतची माहिती देताना श्रृंगला यांनी ही माहिती दिली.
सर्वसाधारणपणे अशा भेटी शिष्टमंडळ पातळीवरच होत असतात. पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात जागतिक पातळीवरील काही नेत्यांची भेट घेणार आहेत. व्हॅटिकन सिटी हे रोममधील एक ठिकाण आहे. तसेच ते रोमन कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च ठिकाण आहे. मोदी 29 ऑक्टोबरला “जी-20′ देशांच्या वातावरण बदलाच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रोमला जाणार आहेत.
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांच्या निमंत्रणावरून मोदी या परिषदेला जाणार आहेत. मोदी उपस्थित राहणार असलेली ही “जी-20′ देशांची आठवी परिषद असणार आहे. गेल्यावर्षीची सौदीमधील परिषद करोनाच्या साथीमुळे आभासी पद्धतीने झाली होती. या परिषदेनंतर लगेचच ग्लासगो याथे संयुक्त राष्ट्राची वातावरण बदलाची परिषदही होणार असून पंतप्रधान या परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.