“मोदींवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट वेळ येणार”

कोलकाता – पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुतण्याच्या पत्नीची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावरून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे.

ममता यांनी पंतप्रधान मोदींना दंगलखोर आणि दैत्य म्हणत टीका केली आहे. त्या हुगळी येथे आयोजित सभेत बोलत होत्या. पंतप्रधान मोदी देशातील सगळ्यात मोठे दंगलखोर आहेत. भाजपकडून तृणमूलला वापरण्यात आलेल्या तोलाबाज या शब्दाला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलने दंगलखोर असा शब्द वापरला आहे. तीन महिन्यांनी बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच येथील राजकारण तापले आहे.

ममता यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाचा शेवट वाईट होईल, असंही म्हटलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट वेळ मोदींवर येणार आहे. ट्रम्प गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण गोलरक्षकाच्या भूमिकेत असून भाजपला एकही गोल करू देणार नसल्याचे ममता यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.