अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 20 वर्षांपासून घटनात्मक पदे भुषवत आहेत. ती कामगिरी जगात कुठल्याच नेत्याला करून दाखवता आलेली नाही. मोदी 2024 मध्ये पुन्हा निवडून येतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील समारंभात शहा बोलत होते. लोकशाही असणाऱ्या देशांत जनता वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना निवडून देते. मात्र, प्रदीर्घ काळ सलगपणे घटनात्मक पदे भुषवणारा मोदींसारखा दुसरा नेता आढळत नाही. त्यांनी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. आता 7 वर्षांपासून ते पंतप्रधानपदावर आहेत.
समर्पित वृत्तीने केलेल्या जनसेवेमुळेच मोदींना ते शक्य झाले. अपूर्ण उद्दिष्टांवर त्यांनी नेहमीच लक्ष केंद्रित केलेले दिसते. देश, राज्य, जनता आणि गरिबांच्या हिताची इतकी काळजी घेणारा त्यांच्यासारखा नेता क्वचितच आढळतो, अशी स्तुतिसुमने शहा यांनी उधळली. पुढे बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या अनेक कामांचा उल्लेख केला. देशात 70 वर्षांत कॉंग्रेस सरकारांनी केलेल्या कामगिरीपेक्षा मोदी सरकारची 7 वर्षांतील कामगिरी सरस ठरेल, असा दावाही त्यांनी केला.