नवी दिल्ली – हिमाचलातील रोहतांग येथील अटल टनेल या 9.02 किमीच्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी काही वेळ एकट्याने चालत जाऊन किंवा नंतर बोगद्यात वाहनाद्वारे जाऊन त्याचे कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होऊ दिले.
पण हे करत असताना रिकाम्या बोगद्यात ते जणू काहीं हजारो लोकांना अभिवादन करीत आहेत अशा थाटात हात हलवत जाताना दिसले आहे. त्यावरून सोशल मीडियात त्यांच्या या कृत्यावर जोरदार टीका टिप्पणी करण्यात आली आहे, त्यामुळे तो एक थट्टेचा विषय ठरला आहे.
यासाठी मोदींवर टीका करताना अनेकांच्या कल्पनाशक्तीला मोठाच बहर आलेला दिसला. एकाने म्हटले आहे की समजा मोदी आयपीएल खेळाडू असले असते तर त्यांनी रिकाम्या स्टेडियमकडे पहात हात हलवून उपस्थित नसलेल्या जमावालाही अभिवादन करण्याची हौस भागवून घेतली असती.
दुसऱ्या एका ट्रोलरने म्हटले आहे की या कृत्याबद्दल मोदींना दूषणे देऊ नका, ते या बोगद्यातून भविष्यात जे लोक येजा करणार आहेत त्यांच्यासाठी ते आधीच हात हलवून त्यांना अभिवादन करून ठेवत आहेत, किती दूरदृष्टीचे नेते आहेत ते !.
आणखी एकाने म्हटले आहे की मोकळ्या बोगद्यात मोदी आपल्या बेस्ट फ्रेंडला पाहून हात हलवत आहेत. अर्थात कॅमेरा हा त्यांचा बेस्ट फेंड आहे अशी खोचक प्रतिक्रीयाहीं त्याने दिली आहे. एकाने या साऱ्या घटनेवर मोदी व्हेव ! अशी मार्मिक प्रतिक्रीयाहीं दिली आहे.