नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला होता, मी तो फेटाळला, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. पवार एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर मला दिली होती. पण मी त्यांना म्हणालो, आपले व्यक्तीगत संबंध खूप चांगले आहेत. ते तसेच राहतील. पण आपण एकत्र काम करणे मला शक्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर असल्याच्या वृत्ताचेही खंडन केले. मात्र, सुप्रिया सुळे यांना मोदी मंत्रीमंडळात स्थान देण्याचा त्यांचा प्रस्ताव होता, असे ते म्हणाले. मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नेहमी स्तुतीसुमने उधळली आहेत. मात्र या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पवार यांच्यावर टीका केली.
2016 मध्ये शरद पवार यांच्या निमंत्रणावरून मोदी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांचे जाहीर गुणगान केले होते. मी व्यक्तीश: पवार यांचा आदर करतो. मी गुजरातचा मुख्यमंत्री असतातना पवार यांनी मला बोट धरून राजकारणात चालायला शिकवले. हे जाहीरपणे सांगायला मला अभिमान वाटतो, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.