जी-7 देशांच्या परिषदेत आज मोदी-ट्रम्प यांची होणार भेट

काश्‍मीर मुद्यावर चर्चा होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेत भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह काश्‍मीर प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

जी- 7 शिखर परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले होते. परिषदेसाठी मोदी बहरीनवरून फ्रान्समधील बियारित्झ शहरात रविवारी सायंकाळी दाखल झाले. परिषदेत मोदी यांचे भाषण होणार असून ते पर्यावरण, वातावरणातील बदल आणि डिजिटल बदल याविषयांवर मोदी बोलणार आहे. त्याचबरोबर बियारित्झमध्ये दाखल झाल्यानंतर मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. बोरिस आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. या भेटीची माहिती मोदी यांनी ट्‌विट करून दिली आहे. व्यापार, संरक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संबंध वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक होणार आहे. काश्‍मीर मुद्यावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी आणि काश्‍मीरमध्ये मानवी अधिकाराचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प मोदीशी चर्चा करणार असल्याचे अमेरिकन प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×