मोदींनी निवडणुकांचे प्रादेशिक स्वरूप संपवण्याचा प्रयत्न केला

ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर यांचे मत

पुणे – राष्ट्रीय पातळीवर विचार करून मत द्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न आजही दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर 2014 पासून निवडणुकांचे प्रादेशिक स्वरूप संपवण्याचा प्रयत्न केल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी मंगळवारी मांडले. श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित “2019 ची निवडणूक समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

ममता बॅनर्जी किंवा दक्षिणेकडील पक्ष निवडणूक स्थानिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेस देखील याप्रमाणे निवडणूक लढवत आहे. कॉंग्रेसने सर्वांशी आघाडी करावी असे सर्वांना वाटते. भाजप विरुद्ध आघाडी केली पाहिजे याची चर्चा कर्नाटकच्या निकालापासून सुरू झाली. परंतु आघाडीचा प्रयत्न यशस्वी ठरतोच असे नाही. 1967 आणि 71 ला असाच केलेला प्रयत्न सपशेल आपटला. मात्र तो 1977 ला यशस्वी झाला. आपण राजकारणात नसतो. आघाडी करायला हवी होती, असे म्हणायला आपल्याला काय जाते? सपा, बसपाला कॉंग्रेस हवी होती का? हे पाहणेही आवश्‍यक आहे. वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसेल. आघाडी केली असती तर एमआयएमबरोबर असणे हे आत्मघातकी ठरले असते, असे मत पळशीकरांनी मांडले.

या निवडणुतीत तीन पर्याय वापरण्याचा कसोशीने प्रयत्न. नरेंद्र मोदी विकास करणार नाहीत, अशी नकारात्मक भावना लोकांमध्ये नाही. मात्र त्यांच्याविषयी विश्‍वासाला तडा गेलेल्यांची संख्या कमी आहे. अजूनही मोदी विकास करतील असा विश्‍वास लोकांना आहे, असे पळशीकर म्हणाले.

सद्यस्थितीत लोकमत मोदींना अनुकूल आहे परंतु मोदी लाट नाही. परंतु मोदींचे पक्षावर नियंत्रण इतके आहे की दुसरा कोणी पंतप्रधान होणे शक्‍य नाही, असेही पळशीकर यांनी नमूद केले.

…राज यांच्या भाषणाने कलाटणी मिळेल, असे नाही
विरोधी पक्षांकडे मुद्दे नाहीत. केवळ प्रादेशिक प्रश्‍न आहेत. सांगण्यासारखे काहीच नाही. गोष्टीरूप सूत्र नाही, म्हणून केवळ स्थानिक चर्चा आहे. कॉंग्रेसने कथा लिहिली पण तो सांगणारा कोणी नाही. भाजपकडील गोष्ट सांगायला टेलर एक आहे. राहुल गांधी वक्ते नाहीत. राफेल मुद्दा सरसकट पोहोचला नाही. काहीतरी घोटाळा झाला आहे परंतु मोदींनी काही केले नाही, असे लोकांना वाटते. राज ठाकरेंनीही सभा घेण्याला सुरूवात केली आहे. परंतु त्यांचा विस्तार मर्यादित आहे. केवळ चांगला वक्ता असूनही उपयोगी नाही तर चांगली प्रतिमाही निर्माण करावी लागते. त्यामुळे राज यांच्या भाषणाने निवडणुकीला कलाटणी मिळेल असे नाही, असे पळशीकर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.