वॉशिंग्टन – जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर राहिले आहेत. जगभरातील 17 नेत्यांच्या यादीमध्ये मोदी यांचा क्रमांक प्रथम लागला आहे. मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासह अन्य नेत्यांना मागे टाकले आहे.
“मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटिलिजन्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील 13 नेत्यांच्या साप्ताहिक रेटिंगच्या आधारे ही क्रमवारी जाहीर केली आहे. इतर नेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदी यांना मिळणारी मान्यतेचे रेटिंग सर्वाधिक असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. हा गट ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेतील सरकारी नेत्यांचे मान्यतेच्या रेटिंग तपासून ही क्रमवारी तपासत असतो.
पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ मेक्सिकोचे अँड्रियास मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि इटलीचे अध्यक्ष मारिओ द्राघी यांना अनुक्रमे 66 टक्के आणि 58 टक्के रेटिंग मिळाले आहे. ज्यो बायडेन हे चौथ्या क्रमांकावर तर अँजेला मर्केल या सहाव्या क्रमांकावर आहेत.