केदारनाथ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले. कालच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी आहे. काल मोदींनी शेवटची प्रचारसभा आणि पत्रकार परिषद घेतली होती.
आज सकाळीच ते येथील जॉलीग्रांट विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या या भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींची गेल्या दोन वर्षातील ही दुसरी केदारनाथ भेट आहे. उद्या ते बद्रिनाथला जाणार आहेत. हिमालयाच्या पर्वत रांगामधील या दोन मंदिरांची दारे याच महिन्यात उघडण्यात आली आहेत. हिवाळ्यात ती मंदिरे बंद ठेवण्यात येतात. सातव्या टप्प्याचे मतदान रविवारी होणार असून गुरूवारी मतमोजणी होणार आहे.
केदारनाथ मंदिराजवळ मोदींची ध्यानधारणा
पारंपारिक पहाडी वेशभुषेमध्ये ते केदारनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी आले. त्यांनी केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची पहाणीही त्यांनी केली. भगवी शाल गुंडाळलेल्या पंतपधानांनी केदारनाथ मंदिराजवळच्या गुहेमध्ये त्यांनी धानधारणाही केली. पंतप्रधानांच्या मंदिरातील भेटीदरम्यान भाविकांना प्रवेश देणे थांबवले गेले होते, असे रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिदियाल यांनी सांगितले.
मोदींनी अन्य विकास कामांचा आढावाही घेतला. उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी केदारनाथ देवस्थानाच्या दुरुस्ती कामांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. 2013 साली झालेल्या ढगफुटीनंतर केदारनाथ मंदिराचे मोठे नुकसान झाले होते.
मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये चारवेळेला केदारनाथला भेट दिली आहे. आजची त्यांची भेट पूर्णपणे अध्यात्मिक असल्याचे भाजपचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी सांगितले.