वॉशिंग्टन- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “सेरावीक ग्लोबल एनर्जी ऍन्ड एन्व्हायरमेंट लीडरशीप ऍवॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या परिषदेमध्ये पंतप्रधानांचे भाषणही होणार आहे. 1 ते 3 मार्च दरम्यान ही परिषद आभासी माध्यमातून होणार आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे विशेष दूत जॉन केरी, बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फौंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेट्स आणि सौदी अरम्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमिन नासीर यांचीही भाषणे होणार आहेत.
देश आणि जगातील भविष्यातील उर्जा गरजा भागविण्यासाठी शाश्वत विकासासाठी भारताचे नेतृत्व वाढविण्याची बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीला रोखण्याच्या उद्देशाने उचललेली पावले यामुळे पंतप्रधान मोदी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असे “आयएचएस’ मार्किटचे उपाध्यक्ष तथा परिषदेचे अध्यक्ष डॅनियल यर्जिन यांनी सांगितले.