दिल्लीतील करोना स्थितीचा मोदींनी घेतला आढावा

नवी दिल्ली – दिल्लीतील करोना स्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा घेतला. दिल्लीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करून स्थिती नियंत्रणात आणली. याच पद्धतीचे अनुकरण संपूर्ण देशात केले जावे अशी सूचना मोदींनी केली आहे. यावेळी मोदींनी देशाच्या अन्य भागातील करोना स्थितीचाही आढावा घेतला. ते म्हणाले की करोना नियंत्रणाच्या संबंधातील माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. विषाणुंचा प्रसार कसा रोखता येईल या विषयी लोकांमध्ये जनजागृतीही करण्याची गरज आहे.

ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, त्या ठिकाणी संबंधित राज्य सरकारांना केंद्रीय पातळीवरून मार्गदर्शन केले जावे. या आढावा बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, कॅबिनेट सचिव आणि अन्य संबंधित आधिकारी उपस्थित होते. अहमदाबादमध्ये करोना रोखण्यासाठी धन्वंतरी रथ या संकल्पनेचा अवलंब केला गेला. ती योजना यशस्वी ठरली आहे. त्याचा वापर देशात अन्यत्रही केला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.