… तर पाकसोबत चर्चेची संधी मोदींनी सोडू नये – राज ठाकरे

मुंबई –  भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकनेही भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय वायुसेनेने पाकचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर पाकिस्तानला अखेर उपरती सुचली असून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संधी सोडू नये, असे आवाहन करत पहिले पाऊलही त्यांनीच उचलायला हवे, असे राज ठाकरेंनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे 
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देखील केलं होतं. या हल्ल्यात आपण आपले सीआरपीएफचे ४० जवान गमावले होते, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यकच होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं.

काल पुन्हा इमरान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चेस तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केेली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवाने या चर्च पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत.

जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे. ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत?

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील निष्ठूरपणे, म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचे वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमा रेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबलाच पाहिजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल की इमरान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत. आणि तसं घडलं तर मात्र नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता कामा नये.

मी पुन्हा एकदा सांगतो की, युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.

Leave A Reply

Your email address will not be published.