मोदींनी दररोज वाढदिवस साजरा करावा-कॉंग्रेस

नवी दिल्ली – देशात करोना लसीकरणाच्या उच्चांकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा (17 सप्टेंबर) मुहूर्त साधण्यात आल्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे. मोदींनी दररोज वाढदिवस साजरा करावा, अशी उपाहासात्मक प्रतिक्रिया त्या पक्षाने दिली आहे.
देशातील नागरिकांना शुक्रवारी करोनालसींचे 2 कोटी 50 लाख डोस देण्यात आले.

एका दिवसातील लसीकरणाचा तो आजवरचा उच्चांक ठरला. त्यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारबरोबरच भाजपशासित राज्यांना लक्ष्य केले. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा आनंदच आहे. पण, त्यासाठी मोदींच्या वाढदिवसापर्यंत प्रतीक्षा का करावी लागली? समजा, मोदींचा वाढदिवस 31 डिसेंबरला असता; तर वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत तेवढ्या लसीकरणासाठी थांबावे लागले असते का, अशी विचारणा त्यांनी ट्विटरवरून केली.

मोदींच्या वाढदिवशी भाजपशासित राज्यांनी सक्रियता दाखवत दैनंदिन सरासरीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लसीकरण केले. इतर दिवशी ती राज्ये निष्क्रीय असतात, असा शाब्दिक टोला चिदंबरम यांनी लगावला. उच्चांकी लसीकरणात बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी मोठा वाटा उचलला. त्याचा संदर्भ चिदंबरम यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.