कॉंग्रेसला स्वत:च्या स्थितीपेक्षा आमचीच अधिक चिंता; मोदींनी केली चौफेर टीका

नवी दिल्ली  – इस्त्रायली यंत्रणा वापरून देशात केली गेलेली हेरगिरी, महागाई आणि करोना लसींचा तुटवडा यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला सातत्याने घेरल्यानंतर आज पंतप्रधान मोदींनीही कॉंग्रेसवर चांगलाच निशाणा साधला.

आज पक्षाच्या संसदीय बैठकीत बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेस बेजबाबदार आहे. त्यांनी देशात नकारात्मकता पसरवली आहे. त्यांना लोकांनी नाकारले आहे. सतत पराभव वाट्याला येत असल्याने त्यांची स्थिती अधिक बिकट झाली आहे. पण कॉंग्रेसला स्वत:च्या स्थिती पेक्षा आमचीच चिंता अधिक वाटते आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

मोदी म्हणाले की केरळ, पश्‍चिम बंगाल, आणि आसामात कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाच्या कोमातून ते अजून बाहेर आलेले नाहीत. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे हे त्यांच्या पचनी पडलेले नाही.

या पक्षाने देशावर 60 वर्ष राज्य केले. आपण राज्य करण्यासाठीच जन्माला आलो आहोत अशी त्यांची धारणा आहे. त्यातूनच त्यांच्याकडून बेजबाबदारपणाचे वर्तन होत आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी लोकांच्या समस्या अधिक सक्षमपणे मांडल्या पाहिजेत पण ते कामही त्यांना नीट करता येत नाही.

देशात करोना लसींचा अजिबात तुटवडा नाही असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. पण तरीही कॉंग्रेस पक्ष देशात नकारात्मकता पसरवत आहे असा आरोप त्यांनी केला. कोविडची समस्या ही राजकीय समस्या नाही, ती मानवतेशी संबंधीत समस्या आहे.

या महामारीच्या काळात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे असा दावाही त्यांनी केला. आज दिल्ली सारख्या ठिकाणीही 20 टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना लस मिळालेली नाही हा काळजीचा विषय नाही काय असा सवालही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.