Maharashtra Assembly Election 2024 – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट हल्ला चढवला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अवघा महाराष्ट्र लुटला. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात मते मागण्यासाठी जागोजागी फिरत आहेत, असे ते म्हणालेत.
मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली, हा विकास आहे का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधताना हाणला.
उद्धव ठाकरे यांची शनिवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप महायुतीवर विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट टीका केली.
ते म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहांना आता महाराष्ट्राची आठवण झाली आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र केवळ लुटण्यासाठी आहे असे वाटत होते. पण आता महाराष्ट्रातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यानुसार आता ते इथे येऊन मतांचा जोगवा मागत आहेत.
या लोकांनी महाराष्ट्राचे सर्व उद्योग लुटून गुजरातला नेता आणि आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मते मागता? तुम्हाला काय वाटते? तुम्ही काही केले तरी चालले आणि महाराष्ट्र केविलवाणेपणाने मत देईल? ही लढाई केवळ उद्धव ठाकरे व शिवसेनेची नाही. आपल्याला सत्ता पाहिजे. पण हे सर्व केवळ महाविकास आघाडीसाठी नाही तर येथील सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला सत्ता हवी आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने आता बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला आहे. कोण कापणारे आहेत? जे काही कापणारे आहेत ते तुमच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत. त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्याचे केवळ फेसबुक पोस्ट टाकली म्हणून बोटे कापली.
ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोटे कापली, त्यांना आम्ही आता राजकारणात कापणार आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी माजी खासदार तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना इशारा देत म्हणाले. चिखलीकर यांच्यावर ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याचा आरोप आहे.
केवळ उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हे
महायुतीचे लोक आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची वल्गना करत आहेत. पण मी स्वतः शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. त्यांनी सरकार पाडले नसते तर मी दुसऱ्यांदा त्यांना कर्जमाफी दिली असती. तेवढी धमक आहे माझ्यात. पण आता त्यांनी रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू केले आहे.
विकासाच्या नावाखाली देशात ढोंग सुरू आहे. केवळ उड्डाणपूल बांधल्यामुळे विकास होत नाही. पण त्या उड्डाणखाली आमच्या बेरोजगारांवर भीक मागण्याची वेळ येत असेल तर उड्डाणपूल काय कामाचा? अरे त्या तरुणांच्या हातांना काम द्या, त्यानंतर आपोआपच विकास होईल.
मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली, हा विकास आहे का? आम्ही असा कोणताही भेदभाव करणार नाही. आम्ही मुलींसारखेच प्रत्येक मुलांना मोफत शिक्षण देईल.