विरोधकांना उद्देशून मोदी म्हणाले डुब मरो !

370 चा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही कसा?

अकोला – काश्‍मीरसाठीचे कलम 370 केंद्र सरकराने रद्द करून जनतेच्या मनातील इच्छा पुर्ण केली. पण कलम 370 चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय असा सवाल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील युवकांनी लष्कराच्यावतीने लढताना काश्‍मीरात आपले बलिदान दिले आहे. तरीही काश्‍मीरचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही असे म्हणणे हे अश्‍लाघ्यपणाचे आहे असे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत विरोधकांना उद्देशून डुब मरो असा इशारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत कलम 370 विषयी अशी भूमिका घेतली जाते आहे हे पाहून मला धक्का बसला असे ते म्हणाले. हा राजकीय विरोधकांचा निर्लज्जपणा आहे असे नमूद करून ते म्हणाले की महाराष्ट्र आणि जम्मू काश्‍मीरचा काही संबंध नाही असे ते निर्लंज्जपणे म्हणत आहेत असा आरोपही त्यांनी केला. जनतेला उद्देशून ते म्हणाले की 370 चे कलम रद्द केल्याने तुम्हीही समाधानी आहात. तुम्ही आनंदी आहात पण काहींना याचा त्रास होतो आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी 370 कलम जपून ठेवण्याचा कसोशीचा प्रयत्न केला पण हे कलम आज लोकांच्या पायाशी गळून पडले आहे असेही ते म्हणाले.

शरद पवार आणि अन्य विरोधकांनी कलम 370 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भांडवल करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सातत्याने खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात भाजपने पाच वर्ष सरकार चालवले पण त्या कामगीरी विषयी लोकांना सांगण्यासारखे काहीही नसल्याने त्यांनी लोकांची दिशाभुल करण्याच्या इराद्याने 370 कलमांचे भांडवल चालवले आहे असा दावा विरोधकांनी सातत्याने केला आहे. त्याचा मोदींनी या सभेत खरपुस समाचार घेत महाराष्ट्रासाठीही 370 चा निर्णय महत्वाचे आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.