वादळग्रस्तांच्या मदतीबद्दल मोदींनी केले पटनाईक यांचे कौतुक

भुवनेश्‍वर – ओडिशात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाच्या परिस्थितीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी परिस्थिती चांगली हाताळली आणि लोकांनी त्यांनी चांगली मदत केली असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींनी ओडिशाच्या वादळग्रस्त भागाची हवाई पहाणी केली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि राज्यातील अधिकाऱ्यांची एक आढावा बैठकही घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की राज्य सरकारने वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल याची काळजी घेतली व त्या प्रकारच्या सुचना त्यांनी राज्यातील नागरीकांना दिल्या. राज्यातील नागरीकांनीही या सुचनांचे पालन करून चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दलही जनतेचे कौतुक केले पाहिजे असे मतही पंतप्रधानांनी नोंदवले.

पंतप्रधानांनी चक्रीवादळग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी या आधीच एक हजार कोटी रूपयांची मदत जाहींर केली असून ओडिशाला गरजेनुसार अधिक निधीही दिला जाईल असे त्यांनी नमूद केले. ओडिशात चक्रीवादळात बळी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी प्रत्येकी दोन लाख रूपये आणि जखमींसाठी प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.