लसीकरणाबाबत मोदींकडून देशाची दिशाभूल – कॉंग्रेस

नवी दिल्ली – करोना लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने शुक्रवारी केला. आतापर्यंत देशातील केवळ 21 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आश्‍वासन मोदी सरकारने दिले आहे. ते उद्दिष्ट कसे गाठणार याविषयी मोदींनी श्‍वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणीही कॉंग्रेसकडून करण्यात आली.

करोनालसींच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाल्यानिमित्त मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढण्याच्या उद्देशातून कॉंग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी भूमिका मांडली. मोदींना दिलेला तपशील म्हणजे अर्धसत्य आहे.

100 कोटी डोसचा टप्पा ओलांडणारा भारत हा पहिला देश असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तो खोटा आहे. चीनने सप्टेंबरमध्येच 216 कोटी डोस दिले. जगात 50 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे दोनच देश आहेत. चीनमधील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर, भारतातील तो आकडा 21 टक्केच आहे. आता भारतातील सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी 70 दिवसांत 106 कोटी डोस कसे देणार ते मोदींनी सांगावे, असे आव्हान वल्लभ यांनी दिले.

देशात 4.53 लाख करोनाबाधित दगावले. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्याऐवजी मोदी आणि त्यांचे सरकार महोत्सव साजरा करत आहे. देशातील जनतेला प्रभावित करणाऱ्या महागाई, दहशतवादासारख्या मुद्‌द्‌यांवर मोदी काहीच बोलले नाहीत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.